You are here

Home » महान्यूज » महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

महाराष्ट्रातील ४ मान्यवरांचा पद्म पुरस्काराने सन्मान

नवी दिल्ली : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज पद्मपुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातून अप्पासाहेब धर्माधिकारी, कैलाश खेर, संजीव कपूर आणि भावना सोमय्या या मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले.  राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित शानदार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनिय योगदान देणाऱ्‍या देशातील मान्यवरांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातून चार मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

पद्म पुरस्कारांचे वितरण दोन टप्प्यात करण्यात येते. आज दुसऱ्‍या टप्प्यात मान्यवरांना पद्म विभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले.

या समारंभात काही मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आले पैकी महाराष्ट्रातील चार मान्यवरांचा यात समावेश आहे. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. कला क्षेत्रातील योगदानासाठी गायक कैलाश खेर, साहित्य आणि शिक्षण तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी भावना सोमय्या यांना तर पाककला क्षेत्रात उत्कृष्ट कार्यासाठी प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

यावर्षी गणतंत्र दिनाच्या पूर्व संध्येला पद्मपुरस्कारासाठी देशातील ८९ मान्यवरांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यात महाराष्ट्रातील एकूण ८ मान्यवरांचा समावेश होता, ३० मार्च २०१७ रोजी पद्मपुरस्कार वितरणाच्या पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नेते शरद पवार, डॉ.तेहेमटॉन उडवाडीया आणि गायिका अनुराधा पौडवाल यांना सन्मानीत करण्यात आले. तर डॉ. एस.व्ही. मापुसकर यांना मरणोत्तर जाहीर पद्मश्री पुरस्कार त्यांच्या मुलीने स्वीकारला होता.

- महान्यूज