You are here

Home » महान्यूज » ट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर

ट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर

ट्रेनमध्ये डिलिव्हरीसाठी धावून आला देवदूत डॉक्टर

नागपूर: थ्री इडियट्समध्ये दाखवलेला प्रसूतीचा कठीण प्रसंग सर्वांच्याच अंगावर काटा आणणारा असा होता. असाच प्रसंग नागपूरमध्ये घडलाय... वर्धा ते नागपूरदरम्यान एका महिलेला प्रसूतीकळा सुरू झाल्या आणि एकच गोंधळ उडाला. नेमकं काय करावं हे तिच्यासोबत असलेल्या नव-यालाही कळायला मार्ग नव्हता. त्यानं गाडीची चेन खेचली आणि कोणी डॉक्टर मिळतोय का यासाठी शोधाशोध सुरू केली...आणि एखाद्या देवदूताप्रमाणे एक डॉक्टर त्यांच्या मदतीला धावून आला..

7 एप्रिलला छत्तीसगडचं एक दाम्पत्य रायपुरला जाण्यासाठी अहमदाबाद-पुरी एक्सप्रेसनं प्रवास करत होतं. यावेळी रेल्वे नागपूरपासून 30 किलोमीटरच्या अंतरावर असताना महिलेला अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्या.. 20 वर्षाच्या या महिलेची प्रकृती झपाट्यानं खालावू लागली. तिच्या नव-यानं घाबरून गाडीची चेन खेचली. घटनेचं गांभीर्य ओळखत सहप्रवाशांनीही रेल्वेत डॉक्टरचा शोध सुरू केला.. यावेळी डॉ. विपीन खडसे हे बोगी नं. एस 8 मध्ये बसले होते. डॉ. विपीन हे इंटर्न डॉक्टर असल्यानं आपल्यापेक्षा कोणीतरी अनुभवी डॉक्टर ट्रेनमध्ये असेल असा विचार करून त्यांनी काही क्षण वाट पाहिली. मात्र नंतर डॉक्टरच न मिळाल्यानं त्यांनी मदतीसाठी धाव घेतली...

डॉ. विपीन पोहोचले तेव्हा बाळ आणि महिलेची स्थिती गंभीर झाली होती. त्यांनी तातडीनं प्रसूतीसाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवानं त्यादिवशी त्यांच्याजवळ प्रसूतीचे साहित्य आणि औषधे होती. यावेळी त्यांनी व्हॉट्सऍपच्या माध्यमातून इतर अनुभवी डॉक्टरांकडून मार्गदर्शनाचं आव्हान केलं. काही मिनिटातच डॉक्टरांनी व्हॉट्सऍपमधून मार्गदर्शन आणि महत्त्वाचे निर्देश देण्यास सुरूवात केली. त्याच मार्गदर्शनाच्या आधारावर डॉ. विपीन यांनी उपचार सुरू केले.

मात्र संकट इथंच दूर झालं नव्हतं. उन्हाने तापलेल्या जनरल डब्ब्यात आईची परिस्थिती खालावतच चालली होती तर बाळालाही श्वासोच्छवास घेण्यास त्रास होऊ लागला होता. शिवाय ते रडतही नव्हते. यावेळी तातडीनं व्हॉट्सऍपवरून डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार डॉ. विपीन यांनी प्रक्रिया सुरू केल्या आणि त्या कोवळ्या जिवाने हंबरडा फोडला.. त्यानंतर नागपूर स्थानकावर बाळ आणि आईला आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. जाता-जाता त्या गरीब मातापित्यानं देवदूत बनून आलेल्या डॉ. विपीन यांना 101 रूपये दिले. आजवर पहिले वेतन न झालेल्या डॉ. विपीन यांच्या आयुष्यातील ही पहिली आणि अनमोल अशी कमाई ठरलीये..

डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप मानलं जातं. एका गरीब दाम्पत्यासाठी ट्रेनमध्ये डॉ. विपीनदेखील एका देवदूताप्रमाणेच धावून आले. त्यामुळे या डॉक्टरचं सर्व स्तरातून कौतुक होतंय..