You are here

Home » महान्यूज » उद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा

उद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा

उद्धव म्हणतायेत ‘एक बंगला बने न्यारा

मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा नवा बंगला वांद्रे येथे तयार होतोय. सहा मजली इमारतीचं बांधकाम सध्या वेगानं सुरू आहे. पाच महिन्यांपूर्वी त्यांना इमारतीच्या बांधकामाची परवानगी मिळाली होती. इमारतीसाठी जागा घेताना उद्धव ठाकरेंना तब्बल अकरा कोटींचा खर्च आला.

'मातोश्री' बंगल्यापासून जवळ, कलानगरमध्येच आलिशान सहा मजली इमारत उभी राहतेय. उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर 2016 मध्ये कलानगरमधील एक प्लॉट11.60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यातील 10 हजार चौरस फुटांहून अधिक जागेवर ते आपलं नवं घर बांधताहेत.या इमारतीत बेसमेंट, स्टिल्ट आणि सहा मजले आहेत.

सुरुवातीला या जागेवर कलाकार के के हेब्बर राहत होते. 1996 मध्ये त्यांचं निधन झाल्यानंतर ही जागा त्यांच्या पत्नींच्या नावावर झाली होती. त्यानंतर, ती वारसा हक्काने हेब्बर यांच्या मुलांकडे आली होती. परंतु, 2007 मध्ये सर्व भावा-बहिणींनी ती प्लॅनेटियम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला 3.5 कोटी रुपयांना विकली होती. प्लॅनेटियमचे मालक राजभूषण आणि जगभूषण दीक्षित यांनी या जागेवर आठ मजली इमारत बनवण्याची परवानगी घेतली होती. त्यांनी हेब्बर कुटुंबाचा दोन मजली बंगला पाडला होता. तसंच, गेल्या वर्षी उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना भूखंड हस्तांतरणाची सशर्त परवानगी मिळाली होती. त्यानुसार, या जागेतून मिळणाऱ्या रकमेतील 50 टक्के रक्कम राज्य सरकारला द्यावी लागणार होती.

त्यानंतर, या जमिनीच्या अधिग्रहण आणि पुनर्विकासासाठी ठाकरे कुटुंबाने कलानगर सहकारी सोसायटीकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेतलं आणि ऑक्टोबर महिन्यात ही जमीन खरेदी केली. ठाकरे कुटुंबानं करारावर स्वाक्षरी करताना प्लॅनेटियम कंपनीला 5.8 कोटी रुपये दिले आणि 5.8 कोटी रुपये उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात जमा केले. त्याशिवाय, स्टॅम्प ड्युटीचे 58 लाख रुपयेही त्यांनीच भरले. लगेचच, 17 ऑक्टोबरला मुंबई महापालिकेनं ठाकरेंना या जागेवर बांधकामाची परवानगी दिली. परवानगीनंतर लगेचच बांधकामाला जोरदार सुरूवातही झालीय. त्यामुळे नवी मातोश्री लवकरच उभी राहणार आहे.