You are here

Home » भटकंती » विदर्भातील तीर्थस्थळे

विदर्भातील तीर्थस्थळे

विदर्भातील तीर्थस्थळे

विदर्भाची भूमी ही संतांची आणि राष्ट्रपुरुषांची आहे. महात्मा गांधी हे साबरमती आश्रम सोडून वर्धाजवळ ‘सेवाग्राम’ येथे काही काळ विसावले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात बौद्ध धर्मांची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपूरला ‘दीक्षाभूमी’ चे पावित्र्य लाभले. सामाजिक प्रश्नांवर सोप्या भाषेत गाणी, ओव्या गाऊन किंवा किर्तन करून भाष्य करणाऱ्या तथा खंजिरीवादक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ‘गुरूकुंज’ मुळे मोझरीला देशभरात ओळख मिळाली. या तिनही व्यक्ती आणि स्थान महात्म्याचा समाजावर प्रभाव आहे. विदर्भ भ्रमण करताना दोन दिवसात मोझरी ते सेवाग्राम व्हाया दीक्षाभूमी असा सहज प्रवास होतो. तिनही ठिकाणी राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे.

 

गुरूकुंजमध्ये संत तुकडोजी महाराज

माणिक बाडोंजी इंगळे असे तुकडोजी महाराजांचे नाव होते. त्यांची वैचारिक बैठक अध्यात्मिक होती. ते खंजिरी हे वाद्य उत्तमपणे वाजवत. सेवाग्राममध्ये मुक्कामी असताना गांधीजींनी तुकडोजी महाराजांना बोलावून घेतले होते. तेथील सामुहिक प्रार्थना पाहून तुकडोजी महाराज भारावले. त्यांनीही सामुहिक प्रार्थनेचा प्रचार-प्रसार केला. आष्टी, चिमूर मुक्ती संग्रामात त्यांना कारावासही झाला. त्यांनी स्वानुभवातून ग्रामगीता रचली. भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत ही उपाधी दिली. त्यांनी भारतीय साधू समाजाचे संघटनही उभे केले. तुकडोजी महाराज अंधश्रद्धा, अस्पृश्यता निर्मुलन, पाखंडी धर्म, गोवध विरोध यासह अन्य सामाजिक वाईट प्रथा-परंपरांवर गायन, किर्तनातून शाब्दीक हल्ले केले. त्यांनी हिंदी आणि मराठी भाषांमध्ये तीन हजार भजन, दोन हजार अभंग, पाच हजार ओव्या लिहिल्या. धार्मिक, सामाजिक, राष्ट्रीय आणि औपचारिक-अनौपचारिक शिक्षणावर सहाशे पेक्षा जास्त लेख लिहिले.

 

दीक्षाभूमीमध्ये  डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धधर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर सामुहिक दीक्षाभूमी म्हणून नागपूरची निवड केली. दि. १४ ऑक्टोबर १९५६ ला त्यांनी सुमारे ३ लाख ८० हजार अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेची इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद करण्यासाठी नागपूर येथे दीक्षा घेण्याचा कार्यक्रम जेथे झाला तेथे सुमारे ४ एकरात दीक्षाभूमी उभारण्यात आली आहे. या जागेवर १२० फूट लांबीचा बौद्ध स्तूप उभारला आहे. या ठिकाणी बुद्धाची मोठी मूर्ती आहे. थाई येथील विद्यार्थ्यांनी ही मूर्ती भेट दिली आहे. या दीक्षाभूमीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे परिसरात बोधीवृक्ष आहे. स्तुपाजवळच्या सभागृहात डॉ.आंबेडकरांच्या जीवनावरील छायाचित्रांचे प्रदर्शन आहे. दरवर्षी किमान १२ लाख पर्यटक येथे भेट देतात. या स्थळाला राज्य सरकारने पर्यटनस्थळाचा ‘अ’ दर्जा दिला आहे.

 

सेवाश्रमात महात्मा गांधीजी

वर्ध्यापासून अवघ्या ९ किलोमीटरवर सेवाश्रम आहे. या आश्रमाची स्थापना महात्मा गांधीजींसाठी जमुनालाल बजाज यांनी केली होती. देशाला स्वातंत्र्य मिळत नाही तोपर्यंत मी साबरमतीच्या आश्रमात जाणार नाही, अशी शपथ गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह संपल्यानंतर घेतली होती. त्यांना तेथे अटक झाली होती. कारागृहातून सुटल्यावर साबरमतीला जायचे नाही म्हटल्यावर जमुनालालजींनी गांधीजींना सेवाग्राम येथे आश्रमासाठी जागा दिली. तेथेच सेवाग्राम उभे राहिले. आदि निवास, बापू कुटी, प्रार्थना भूमी, कस्तुरबा कुटी, मीराबेन कुटी, महादेवभाई कुटी, भोजन कुटी, परचुरे कुटी, कार्यालय आदींचे निर्माण गरजेनुसार झाले. या आश्रमाचे वैशिष्ट्य असे की, येथील घरे आजही पूर्वापार स्थितीत ठेवली आहेत. कौलारु घरे, मातीच्या भिंती, बांबूंचे छत, मातीची-तांब्या पितळेची भांडी, चरखे, लाकडी खडावा, दांडी यात्रेची काठी, गोल फ्रेमचा चष्मा, कंदील असे अनेक विषय पाहताना, समजून घेताना गांधीजींच्या आयुष्याचे अनेक प्रसंग उलगडत जातात.

या तिनही ठिकाणी. तुकडोजी महाराज, आंबेडकर आणि गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्रे मनाला अंतर्मुख करतात. तिनही ठिकाणच्या एका प्रसंगाचे छायाचित्र कमालीचे मनांत ठसतात ते म्हणजे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, भारतरत्न आंबेडकर आणि महात्मा गांधीजींची अंत्ययात्रा. प्रचंड गर्दीचे त्या-त्यावेळी उच्चांक ठरलेली छायाचित्रे आजही डोळ्यांसमोरून जात नाहीत.

Mahatma Gandhi
B. R. Ambedkar
tukdoji maharaj