You are here

Home » भटकंती » राष्ट्रीय पक्षी अभयारण्य - नवेगांव बांध

राष्ट्रीय पक्षी अभयारण्य - नवेगांव बांध

जिल्हा-गोंदिया,तालुका -मोरगाव

निसर्गातलं एक अद्भुत रसायन म्हणजे पक्षी! पक्षांचे विविध रंग...त्यांची आकर्षक घरटी...त्यांचे गोड गुंजन...सारे काही लोभसवाने! महाराष्ट्राच्या पूर्वेकडील तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील एक अत्यंत अद्भुत आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणजे नवेगांव बांध! जिल्ह्याच्या दक्षिणेस अर्जुनी मोरगांव तालुक्यात गोंदियापासून 65 कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण निसर्गाच्या वैविध्याने नटलेले आहे! विशेष म्हणजे या घनदाट जंगलात महाराष्ट्र शासनाची अगदी नियमित बससेवा तसेच खाजगी वाहनांची उत्तम व्यवस्था तर आहेच पण गोंदिया-चंद्रपूर लोहमार्गावरील देवूलगाव हे रेल्वे स्टेशन नवेगांव बांधपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने रेल्वेने प्रवासही सुखकर ठरतो! उपराजधानी नागपूरपासून 150 कि.मी. असलेल्या नवेगांव बांधला निसर्गप्रेमी माधवराव पाटील यांच्या प्रयत्नातून 22 नोव्हेम्बर 1975 रोजी राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला!
हे उद्यान वनविभाग नागपूर अंतर्गत येत असून जवळपास जंगलाचे प्रकार 5ए/सी 3 आहे. यात सुमारे 209 प्रकारचे पक्षी, 9 प्रकारच्या सरपटणाऱ्या जाती, 26 प्रकारचे मांसाहारी प्राणी आढळतात. ज्यात मुख्यत्वे वाघ, चित्ता, जंगली मांजर, हरिण, कोल्हा, लांडगा यांचा समावेश आहे. नवेगांव बांधच्या धरणाला दहा प्रवेशद्वारं असून या धरणाची लांबी 541 मीटर ऊंची जवळपास 30 मीटर तर लांबी 71 मीटर आहे. ऊंच मनोरे आणि झाडांवरची घरे ही नवेगांव बांधची वैशिष्टे असून या मनोऱ्यांवरून आपल्या दुर्बिनीतून दूरवरच्या प्राण्यांची..पक्षांची नजरभेट होते. उत्तम प्रतीचा कॅमेरा सोबत असेल तर वाघांच्या, पक्षांच्या सुंदर छवी टिपता येतात!

या बांधापासून 8 किलोमीटर अंतरावर पूर्णपणे लाकडी बनावटीची वैशिष्ट्यपूर्ण संजय कुटी आहे. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे सूपुत्र संजय गांधी यांच्या हस्ते या कुटीच्या उद्घाटनाचे आयोजन होते परंतु संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूमुळे ते होऊ शकले नाही त्यामुळे त्यांची स्मृती म्हणून या कुटीस 'संजय कुटी' असे नामकरण झाले. इथे अतिथी गृह असून रास्त दरात मुक्कामाची उत्तम व्यवस्था होते.

नवेगांव बांधची जंगले औषधी-वनस्पतींसाठी नावाजलेली आहेत. सागवान, बेहडा, शिसम अशा औषधी वनस्पती इथे आढळून येतात. हिरवीगार वनराई, दूरवर पसरलेली पहाडी, पहाडांच रोज नव्याने चुंबन घेणारे सोनेरी सूर्यकिरण आणि त्या पहाडांचे तलावाच्या निळ्याशार पाण्यात हिरवेगार प्रतिबिंब! हे सारे काही कोणत्याही ऋतूत सुखदसे असले तरी हिवाळ्यातला ऑक्टोबर ते डिसेंबरचा काळ पक्षी निरीक्षणासाठी उत्तम; कारण महाराष्ट्रातील निम्याहून अधिक प्रजाती तर येथे आढळतातच पण याच गोड गुलाबी थंडीच्या मोसमात परदेशातून वैविध्यपूर्ण पक्षी या तलावाकाठी स्थलांतर करतात. इथे प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य, हरणांचा पार्क आणि सुंदर बगीचे आपली सैर अधिक प्रसन्न करण्यासाठी सज्ज असतात.

भौगोलिक दृष्ट्या वैविध्य जपणाऱ्या नवेगांव बांधच्या भारतीय इतिहासातही उल्लेखनीय खुणा आढळतात. तेराव्या शतकातील कोहली जमातीचे अस्तित्व, त्यांची शिल्पकला आणि स्थापत्य असोत वा राणी दुर्गावतीचा गोंड राजा दलपत शाह यांच्याशी झालेला विवाह आणि त्यानंतर तिने इथल्या प्रजेच्या हितासाठी केलेले विधायक कार्य असोत! इथला निसर्ग हा त्या प्रगल्भ इतिहासाची साक्ष आहे!

मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या दोन राज्यांच्या सीमालगत असल्याने पर्यटनदृष्ट्या हे ठिकाण फार महत्त्वाचे आहे! नवेगांव बांध या स्थळाची अद्वैत अनुभूती म्हणजे जिप्सी गाडीतून जंगल सफारी, निळ्याशार पाण्यावर बोटिंग आणि झाडांवरच्या घरात वास्तव्य! नवेगांव पासून इटियाडोह, प्रतापगड, शशिकरण पहाडी, घुकेश्वरी माता मंदिर, सिरपूर धरण, गोठणगाव ही अगदी जवळच्या अंतरावर असलेली फार सुंदर अशी प्रेक्षणीय स्थळे आहेत. गोठणगावच्या अनेक वैशिष्ट्यापैकी एक म्हणजे भारतातून लोप पावत चाललेली एक अलिप्त अशी तिबेटी जमात! मंदिरासमोर हाताने मनीचक्र फिरविणारे निरागस तिबेटी बांधव....तेवत रहाणारे मेणाचे लखलखते दिवे....मानवतेचा संदेश देणारी भगवान गौतम बुद्धांची शांत प्रतिमा... या सर्व निरामय अनुभूतींसाठी नवेगावात निदान चार ते पाच दिवसांचा मुक्काम हवाच कारण गोठणगावात राहण्याची काही व्यवस्था नाही मात्र तिथे जागोजाग बांधलेले मचान खास हिवाळ्यात आढळणाऱ्या क्रोंच पक्षाच्या दर्शनासाठी! नामशेष होत चाललेले हे क्रोन्च कदाचित आजही एखाद्या ऋषिची तपश्चर्या भंग करतील एवढे असीम सुंदर! वाघ, बाग आणि पक्ष्यांना या हिरव्यागार वनराईत अनुभवून मनही कवि होऊ लागतं!

 Nawegaon Bandh