You are here

Home » भटकंती » मुंबईच्या जवळचे किल्ले : सेंट जॉर्ज किल्ला

मुंबईच्या जवळचे किल्ले : सेंट जॉर्ज किल्ला

सध्याच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला लागून असलेल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलच्या जागेत हा किल्ला होता. हा किल्ला त्याच्या पूर्ण स्वरुपात शिल्लक नसला तरी त्याचा एक अवशेष आजही अस्तित्वात असून तो “सेंट जॉर्ज किल्ला” याच नावाने ओळखला जातो. हा किल्ला जेव्हा अस्तित्वात होता तेव्हा त्याचे उत्तरेकडील टोक सध्याच्या मसजीद भागाच्या जवळपास होते.

बॉम्बे कॅसल, त्यानंतर त्या सभोवताली विस्तारित व विकसित झालेला मुंबईचा किल्ला किंवा फोर्ट एवढे असूनही ब्रिटिशांना या फोर्ट किल्ल्याच्या उत्तरेला पूर्वेकडील समुद्रकिनाऱ्यानजिक आणखी एक छोटेखानी किल्ला बांधण्याची निकड भासली ! आणि त्याला कारणही तसेच होते. ब्रिटिशांना नेपोलियन भारतावर चालून येईल अशी भीती वाटत होती. खरोखरीच जर नेपोलियन भारतावर चालून आला आणि त्याने मुंबईवर हल्ला केला तर मुंबईतील गोऱ्या लोकांच्या (म्हणजे ब्रिटिश लोकांच्या) बचावासाठी ब्रिटिशांनी ही योजना आखली.

त्यांनी मुख्य किल्ल्यालगतच उत्तरेस आणखी एक किल्ला बांधला. हा किल्ला फक्त ब्रिटिश लोकांच्या वास्तव्याकरीता होता. जर नेपोलियनचे आक्रमण झाले तर मुख्य किल्ल्यावरील व नौदलातील लोक फ्रेंच सेनेशी झुंज देतील आणि त्यात अपयश येत आहे असे वाटले तर ही सर्व ब्रिटिश मंडळी छोट्या नौकांमधून किंवा गलबतांमधून ठाण्याला किंवा पनवेलला मराठ्यांच्या आश्रयार्थ जातील अशी ही योजना होती. गव्हर्नर बाऊचियरने मराठ्यांशी तशी बोलणीही केली होती. ब्रिटिश लोक अत्यंत कमी शक्यता असलेल्या गोष्टींचाही किती काळजीपूर्वक विचार करत आणि त्याकरीता उपाययोजना करुन ठेवत याचे हा किल्ला एक उत्तम प्रतीक आहे.

आज हा किल्ला पूर्ण स्वरुपात अस्तित्वात नसला तरी याबाबत आढळणाऱ्या उल्लेखांमधून या किल्ल्याच्या भिंती पोर्तुगीज धाटणीप्रमाणे उताराच्या होत्या व किल्ल्यात गोलाकार कमानींनी व तळघरांनी युक्त असलेल्या वास्तू होत्या अशी माहिती मिळते. हा किल्ला फक्त ब्रिटिशांकरीताच व तोही संकटकाळातील उपाययोजना म्हणून बांधलेला असल्यामुळे या माहितीत तथ्य असावे असे वाटते.

नंतर 1889 ते 1982 या काळात येथे एक रुग्णालय उभारण्यात आले. या रुग्णालयालाही सेंट जॉर्जचेच नाव देण्यात आले. बार्टर फ्रियरने जेव्हा हा किल्ला पाडला तेव्हा त्याने प्रामुख्याने तटबंदी पाडून टाकली असणार. तथापि हे रुग्णालय बांधताना आतील वास्तूही एकतर पाडून टाकल्या गेल्या असणार किंवा त्यांच्या रचनेतही फेरफार घडून आले असणार. खुद्द ब्रिटिशांच्या काळातच बंदराच्या व रेल्वेच्या विकासकामे करताना या किल्ल्यामध्ये अनेक फेरफार घडून आले असणार.

स्वातंत्र्योत्तर काळामध्ये या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी आणखी काही निवासस्थाने बांधण्यात आली. यात वाहतुकीसाठी डांबरी रस्तेही बांधण्यात आले. कदाचित नवीन ड्रेनेजयंत्रणाही बांधली गेली असावी. त्यामुळे मूळ किल्ल्याचे एकंदरित स्वरुप पूर्णपणे बदलून गेले. तथापि 1827 साली बनविण्यात आलेल्या नकाशात सेंट जॉर्ज किल्ला स्पष्टपणे दाखविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सेंट जॉर्ज किल्ल्यातील एक दारुगोळ्याच्या कोठाराची इमारत मात्र या सर्व घडामोडींमधेही सुरक्षितपणे टिकून आहे. या कोठाराचे वर्णन “फ्रॅगमेंट ऑफ ओर्ल्ड फोर्ट वॉल” असे करण्यात येत असे. आज मात्र ही इमारत सेंट जॉर्ज किल्ला म्हणून ओळखली जाते.

सद्य:स्थितीत हा किल्ला “राज्य संरक्षित स्मारक” असून तो पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या ताब्यात आहे. त्याची जतन-दुरुस्ती वेळोवळी करण्यात आली असून या स्मारकाची सर्वांगीण जतन-दुरुस्ती करण्यात आली आहे. निराळ्या शब्दात हा किल्ला (म्हणजे ही कोठाराची वास्तू) अत्यंत चांगल्या स्थितीत शाबूत आहे.

सप्तवार्षिक युद्धाच्या धामधुमित एक संकटकालीन योजना म्हणून बांधलेला हा किल्लाही अत्यंत काळजीपूर्वक योजना आखून बांधला होता यात शंका नाही. अवशिष्ट वास्तूच्या बाह्य भिंतीचे स्वरुप, काळजीपूर्वक केलेली वायुविजनाची व्यवस्था इत्यादी बाबी काटेकोर व दक्ष नियोजनाची साक्ष देतात. तत्कालीन वर्णनांप्रमाणे या किल्ल्यातील वास्तूंना तळघरे होती व ती अन्य वास्तूंच्या तळघरांना भूमिगत मार्गांनी जोडलेली होती असे दिसते. सर्व शक्यतांचा विचार करुन त्यांना सामोरे जाण्यास तयार असणे व कोणत्याही परिस्थितीत डगमगून न जाता शक्य तितकी उपाययोजना अगदी काटेकोरपणे करणे ही ब्रिटिशांची वृत्ती होती. या वृत्तीचाच एक भौतिक आविष्कार म्हणजे सेंट जॉर्ज किल्ला होय.
 

Saint George Fort