You are here

Home » भटकंती » मुंबईच्या जवळचे किल्ले : शिरगावचा किल्ला

मुंबईच्या जवळचे किल्ले : शिरगावचा किल्ला

पालघर जिल्ह्यातील शिरगाव या गावी असलेला किल्ला हा या गावच्या नावावरुन म्हणजेच शिरगावचा किल्ला म्हणून ओळखला जातो. पश्चिम मुंबई अहमदाबाद रेल्वे मार्गावर पालघर स्टेशन आहे. या स्टेशनवरुन शिरगावला जाण्यासाठी एस.टी.बसेसची सोय आहे. शिरगाव हे गाव तसे लहानसेच असून गावात प्रवेश केल्यावर येथील किल्ला स्पष्टपणे नजरेत भरतो. मुंबईहून मोटारीने जायचे अ सल्यास पश्चिम द्रुतगती महामार्गाने पालघर मार्गे या ठिकाणी जाता येते.

16 व्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांनी उत्तर कोकणात जे किल्ले बांधले त्यातील शिरगावचा किल्ला हा एक महत्त्वाचा किल्ला होता. या उत्तर कोकणात संपादन केलेल्या प्रदेशात पोर्तुगीजांनी अनन्वित धार्मिक अत्याचारांना सुरवात केली. पोर्तुगीज प्रदेशातील (फिरंगाणातील) हिंदू-मुसलमान या अत्याचारांनी अगदी त्रस्त बनले होते. अगदी शिवाजी महाराजांच्या काळापासून मराठ्यांच्या पोर्तुगीजांशी होणाऱ्या तहांमध्ये धार्मिक अत्याचार न करण्याबाबतचे कलम असे. तथापि त्याची अंमलबजावणी फारच क्वचित होत असे. याबाबतच्या वाढत्या तक्रारी पेशवे पहिले बाजीराव व चिमाजीअप्पा यांच्याकडे येऊ लागल्या. तेव्हा हिंदूंना धार्मिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पोर्तुगीजांचा उत्तर कोकणातून समूळ उच्चाटन केले पाहिजे हा विचार पेशव्यांच्या मनात जोर करु लागला. त्याप्रमाणे इ.स.1730 मध्ये फिरंगाणावर आक्रमणांना सुरवातही झाली. तथापि अचानकपणे निजामाने डोके वर काढल्यामुळे ही मोहिम आवरती घेऊन मराठ्यांना पोर्तुगीजांशी तह करावा लागला. तथापि फिरंगाण जिंकण्याच्या मोहिमेचा अंत झाला नाही. इ.स.1737 मध्ये स्वारीची योजना पुन्हा एकदा अंमलात आली.

शिरगावचा मुख्य किल्ला आयताकार क्षेत्राचा, त्याला उत्तर बाजूस किल्ल्याच्या दरवाजाच्या इमारतीचा प्रक्षेप, पश्चिमेकडील तटबंदीनंतर काही मीटर अंतरावर तुलनेने गिड्ड्या असलेल्या आणखी एका तटबंदीची जोड, मुख्य किल्ल्यातील पश्चिम निवासी इमारतीचे आधिक्य असा या किल्ल्याचा सर्वसाधारण तलविन्यास आहे.

किल्ल्याच्या उत्तर बाजूस किल्ल्याचे महाद्वार असलेल्या इमारतीचा प्रक्षेप (भिंतीचा किंवा वास्तुचा पुढे आलेला भाग) आहे. हा प्रक्षेप किंवा महाद्वार असलेली इमारत वैशिष्टपूर्ण आहे. किल्ल्याच्या उत्तर तटबंदीच्या पूर्व टोकापासून (म्हणजेच बुरुजापासून जर आपण दुसऱ्या टोकाकडे जायला निघालो तर दरवाज्याच्या इमारतीच्या किंचित आधी तटबंदीचा भाग काटकोनी वळण घेऊन काहीसा आत सरकलेला आढळतो. त्यानंतर ही दरवाजा असलेली इमारत लागते. या आयताकार तलविन्यासाच्या तटबंदीतील प्रक्षेप असलेल्या इमारतीचा दरवाजा पूर्वभिमुख असून दरवाज्याच्या उत्तरेस एक वर्तुळाकार तलविन्यासाचा बुरुज आहे.

ही महाद्वाराची इमारत म्हणजेच या द्वारातून आत जाण्यापूर्वी व्यक्ती अथवा सैन्य किंचित आत सरकलेल्या तटबंदीची पश्चिमाभिमुख व पूर्वाभिमुख बाजू, महाद्वारालगतचा बुरुज यांच्या माराच्या टप्प्यात येत असे. इमारत दुमजली (तळमजला + दोन मजले) असून महाद्वाराच्या वरतीच गोळीबार करण्यासाठी गवाक्ष आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या सर्व बाजूंनी मोठमोठी गवाक्षे आहेत व यातील बहुतांशी बुरुज असून या बुरुजावर एक मेघडंबरीसारखी घुमटाची वास्तू उभारण्यात आली आहे. इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्याच्या जमिनी प्रथम दणकट लाकडी फळ्या व त्यावर मुरुम या प्रकारे बनवण्यात आल्या होत्या. लाकडी फळ्या एकेकाळी भिंतीत ज्या ठिकाणी रोवण्यात आल्या होत्या तिथे आजही खाचा अगदी स्पष्टपणे दिसतात. इमारतींच्या अंतर्भागामध्ये काही ठिकाणी कोनाडे दिसतात व हे कोनाडे एतद्देशीय व विशेषत: मध्ययुगीन महाराष्ट्रातील चौसोपी वाड्यामध्ये असतात तसे आहेत. तिसऱ्या मजल्यावरील पश्चिमेकडील गवाक्षातून समुद्र दिसतो. महाद्वारातून आत शिरल्यानंतर किल्ल्यात जाण्यासाठी डावीकडे वळावे लागते.

महाद्वाराचा आकार महाराष्ट्रातील एतद्देशीय किल्ल्यांच्या महाद्वारासारखा आहे, पोर्तुगीज प्रकारचा चौकोनी आकारचा नाही. महाद्वार असलेल्या या वास्तूच्या अंतर्भागात असलेले काही कोनाडे निर्विवादपणे पेशव्यांच्या काळातील शैलीतील आहेत. महाद्वाराशेजारी असलेला वर्तुळाकृती तलविन्यासाचा बुरुज व त्यावरील घुमट असलेली मेघडंबरीसारखी वास्तू तर निर्विवादपणे मराठा स्थापत्याची आहे.

महाद्वारातून आत गेल्यानंतर किल्ल्याच्या अंतर्भागाकडे जाण्यासाठी डावीकडे एक दरवाजा लागतो. हा दरवाजा किंवा मार्ग मुख्य तटबंदीमधून जातो. मात्र या मार्गाव्यतिरिक्त अन्य दालनात जाण्यासाठी कोणतेही द्वार अथवा मार्ग नाही. ही वास्तू एकमजली (तळमजला+वरचा मजला) असून तिला एकेकाळी कौलांचे छप्पर होते हे या वास्तूच्या बाजूच्या भिंतींच्या अवशेषांवरुन स्पष्ट होते.

शिरगावचा किल्ला हा खोल समुद्रानजिक असलेला निम-जलदुर्ग नाही की फार मोठा फौजफाटा व अन्य सामुग्री घेऊन वर्षभर शत्रूचा लढा सोसू शकेल असा एतद्देशीय किल्ल्यांप्रमाणे मातब्बर किल्लाही नाही. म्हणूनच हा किल्ला वस्तुनिष्ठपणे फार महत्त्वाचा होता असे म्हणता येणार नाही. पण फिरंगाणातील पोर्तुगीजांकरता मात्र तो अत्यंत मोक्याचा व समुद्रावर वचक ठेवण्याकरता अत्यंत सोयीचा होता असेच म्हणावे लागेल व याचा प्रत्यय मराठ्यांच्या आक्रमणाचा वेळी आला. या किल्ल्याच्या समुद्राजवळील स्थानामुळेच अत्यंत बिकट स्थितीतही पेद्रू दमेलला हा वेढा मोडता आला. त्याने केळव्यात गलबते आणून केळवे व माहिमही सोडवले; पण त्याला तांदुळवाडीचा डोंगरी किल्ला परत मिळवता आला नाही.

सद्यस्थितीत किल्ल्याचे मूळ स्वरुप काय असावे याची कल्पना येईल इतपत अवशेष या किल्ल्यात आजही टिकून आहेत. मनोऱ्याच्या इमारतीचा वरचा मजला, जमिनी व दालनांची छते काळाच्या ओघात नष्ट झाली असली तरी किल्ल्याचा बाकी भाग बऱ्यापैकी शाबूत आहे. तथापि दर पावसाळ्यात येथे झाडी मोठ्या प्रमाणावर वाढते.

स्थापत्याच्या व पुरातत्व शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा किल्ला अत्यंत महत्वाचा आहे. या किल्ल्याचे चार टोकांना असलेले चार बुरुज अत्यंत वेगवेगळे आहेत. समुद्राच्या लाटांच्या परिणाम होऊन किल्ल्याचा पाया खचू नये यासाठी पश्चिमेच्या बाजूला करण्यात आलेले विस्तारित बांधकाम अत्यंत उल्लेखनीय आहे. जलमार्गाच्या जवळ असलेला दुर्ग म्हणून पोर्तुगीजांनी या किल्ल्याची विशेष काळजी घेतलेली आढळते. या किल्ल्याचे अवाढव्य बुरुज याची साक्ष देतात.