You are here

Home » फिटनेस » आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा

आला उन्हाळा… आरोग्य सांभाळा

उन्हाळा सुरु झाल्यावर ऋतूतील झालेल्या बदलांमुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात, यात प्रामुख्याने त्वचाविकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपायाबरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे. उन्हाळ्यामध्ये साधारणत: सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता असते.

भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिलेल्या सूचनांनुसार दिनांक 17 ते 21 मे 2016 या कालावधीत राज्यात उष्णतेची लाट मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारिरीक ताण पडून मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे अथवा काय करू नये याबाबतच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
 

काय करावे

 • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडीओ, टी.व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
 • तहान लागलेली नसली तरीसुद्धा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे.
 • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
 • बाहेर जाताना गॉगल्स, छत्री/टोपी, बुट व चपलाचा वापर करण्यात यावा.
 • प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत घ्यावी.
 • उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा.
 • तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान, चेहरा झाकावा.
 • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ओ.आर.एस., घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादींचा वापर नियमित करण्यात यावा.
 • अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
 • गुरांना छावणीत ठेवण्यात यावे. तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
 • घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा.
 • तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
 • पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे.
 • कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
 • सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करावे.
 • पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा.
 • बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.
 • गरोदर महिला व आजारी व्यक्तींची अधिकची काळजी घेण्यात यावी.
 • रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणासाठी शेड उभारावेत.
 • जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.
 •  

काय करू नये

 • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
 • दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे.
 • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
 • बाहेर तापमान जास्त असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, तसेच दुपारी 12 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करण्याचे टाळावे.
 • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे.
 • तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
 • शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा.
 • शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.

चला तर मग उन्हाची काळजी घ्यायलाच हवी.

-संप्रदा द. बीडकर,
प्र. जिल्हा माहिती अधिकारी, सांगली